Ashadhi Ekadashi Kirtan
पुण्यामध्ये साकारली भक्तीची वारी…!
गेली तीस वर्षे गुरुदेव शंकर अभ्यंकर आषाढी एकादशीला वारकरी कीर्तनाच्या भक्तीरंगात श्रोत्यांना रंगवून टाकतात.
याही वर्षी हा अनुपम सोहळा संपन्न झाला .माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते गुरुदेव लिखित ‘संत तुकाराम’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले आणि त्यानंतर जय जय राम कृष्ण हरी ने कीर्तनाला सुरुवात झाली. पुढचे दोन तास शब्दसामर्थ्य आणि संगीताचे सामर्थ्य काय असते हे सर्वांना अनुभवायला मिळाले. सेवेचा अभंग होता संत तुकारामांचा ‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ‘. ज्ञान म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, चरणी लीन होणे म्हणजे काय हे गुरुदेवांनी उदाहरणासह अत्यंत भावपूर्ण व प्रज्ञायुक्त भाषेमध्ये समजावून सांगितले. आणि त्याच्या जोडीला तो तो भाव व्यक्त करणारे अभंग त्यांचे चिरंजीव जितेंद्र अभ्यंकर व आदित्य अभ्यंकर यांनी गाऊन दाखवले. सर्व टाळकऱ्यांची त्यांना उत्तम साथ लाभली. त्यांनी धरलेले रिंगण पाहून सर्व श्रोतेही त्यामध्ये टाळ्या वाजवत सहभागी झाले. पेटी आणि तबला, मृदुंग यांच्या तालावर जणू विठ्ठल डोलत होता असे वाटत होते. ‘शरण शरण नारायणा’ हा अभंग गाताना गुरुदेवांच्या आणि सर्वच श्रोत्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वहात होते.
भैरवीने या अपूर्व कीर्तनाची सांगता झाली.
‘जय जय राम कृष्ण हरी’














